आनंदाचा अमृतानुभव
नुकताच “कट्यार काळजात घुसली” हा चित्रपट पाहिला. दोन दिवस झाले तरी अजून त्याची मोहिनी उतरत नाही.
काही काही प्रसंग, अनुभव वा घटना अशा असतात कि त्यांचा अविष्कार हा आपल्या कित्येक
शुभंकर संचितांचा प्रसाद असतो. त्यातलाच हा चित्रपट…..
कालप्रवाहा बरोबर लयाला गेलेल्या मराठी संगित रंगभूमीला
पुनरुज्जिवित करण्याचा प्रयत्न अलिकडे होतोय. “कट्यार……“ ची निर्मितीचा त्याला मोठा
हातभार लागणार आहे.
मूळ नाटकाच्या सौंदर्याला
कुठलाही ओरखडा न जाऊ देता नितांतसुंदर चित्रपट बनवणे अवघड. त्यातून मूळ नाटक हे दारव्हेकर-अभिषेकी-वसंतराव
देशपांडे ह्या हिमालयाएवढ्या कलावंतांनी ज्या प्रचंड उंचीवर नेऊन ठेवले आहे, त्यासमोर
तोडीस तोड कलाकृती निर्माण करायची हे साधे आव्हान नव्हे! मात्र सुबोध भावेंनी अत्यंत
लीलया ते पेललंय!
अभिजात हिंदुस्थानी शास्त्रीय संगित आणि घराण्यांची
गायकी हा ह्या “कट्यार……“ चा आत्मा. मूळ नाटकातली “घेई छंद…”, “तेजोनिधी लोहगोल” ,
“सुरत पियाकी” , “लागी करजवा” यासारखी पदे ज्या ताकदीने वसंतराव-अभिषेकींनी गायलीत
त्याच ताकदीने आणि पुन्हा चित्रपट-माध्यमाच्या मर्यादा पाळून शंकर महादेवन, महेश काळे,
राहुल देशपांडे ह्या कलाकारांनी गायलीत. नाटकात नसलेलं कथानक आणि त्या अनुषंगाने येणारी नवी गाणी इतके दर्जेदार अन
बेमालूम एकजीव झालेत की ते सारे मूळ कलाकृतीचाच भाग वाटावे…. पूर्वसुरींच्या भरजरी
पैठणीला ठिगळ लावावे अथवा आचार्य अत्र्यांच्या भाषेत म्हणायचे तर दारव्हेकर- अभिषेकी-
वसंतराव देशपांडे ह्यांच्या ताजमहालाला सुबोध आणि मंडळींनी स्वतःच्या विटा लावाव्यात असं अजिबात झालेलं नाही. तर त्याच संगमरवराने
आणि त्याच कलाकुसरीने हा ताजमहाल वाढवलाय….
जी गोष्ट जुन्या पदांची
तीच नव्याने बनवलेल्या गीतांची. “ दिलकी तपिश” , “यार इलाही” ,” शिव भोला” वगैरे गाणी आणि अरिजितसिंग सारख्या नव्या पिढितल्या
गायकांची अदाकारी केवळ विलक्षण…..
दिग्दर्शन, अभिनय,छायाचित्रण,लोकेशन्स,स्पेशल इफेक्टस…..
अप्रतिम!! शंकर महादेवनचा अभिनेता म्हणून पदार्पणाचा सिनेमा. पण त्याने लाजवाब काम
केलंय. पंडितजींचा अश्रापपणा त्याच्या मुळातल्याच निरागस चेहेर्यातून सुंदर व्यक्त
झालाय. सुबोध भावेने सदाशिव अप्रतिम रंगवलाय. अमृता खानविलकर, मृण्मयी देशपांडे,साक्षी
तन्वर ह्यांनी “ अभिनेत्री” पदाला योग्य न्याय दिलाय. ….. आणि “खांसाहेब”…….. सचिनचा खांसाहेब हा अष्टदिशांनी
कुठल्याही कोनातून पाहिला तरी जातीवंत खांसाहेबच वाटतो. सचिनची जीभ तर बोलतेच, डोळेही
बोलतात……..पण चेहेर्यावरची रेष-न-रेष बोलते, दाढीचा एकेक केसही बोलतो एवढी समरसून
भूमिका त्यांनी साकारलीय. जणू भूमिका जगलेत.
आपल्या आयुष्यभराच्या कलासाधनेचं कसब एखाद्या भूमिकेसाठी पणाला लावावं आणि तिचं
सोनं करावं असं भाग्य थोड्या कलावंतांना लाभतं.
ते याठिकाणी सचिनना लाभलंय. आपला आवाज, अभिनय, संवादफेक, उर्दूवरचं प्रभुत्व,
देहबोली सर्वासर्वांच सोनं केलंय……
कुणा तृषार्ताची तहान
भागवण्यासाठी कृष्णमेघांनी जलधारांचा वर्षाव करावा अन त्याच्या शरीर-मनाला चिंब भिजवून टाकावं तसे
अभिनय, अभिजात संगित यांच्या अमृत धारांनी आपण नखशिखांत भिजून तृप्त होतो…. त्या आनंदवर्षावाच्या
धारा आपल्या डोळ्यांमधूनही कधी वाहू लागतात ,कळतही नाही…….