Sunday, 13 September 2015

 पुरुषप्रधान मानसिकता आपल्या जन्मापासूनच पिंडात नकळत भिनलेली असते असाच अनुभव येतो. मलाही लहानपणी कित्येकदा तो येत असे. हि मानसिकता भेदण्याची प्रवृतीपण जन्मजात असावी लागते,ती लाभण्या इतका मी सुदैवी आहे.

१०-११ वर्षांचा असताना मी सुटीत एका नातेवाईकाकडे गेलो होतो.  माझ्या वयाची ५-६ मुलं तिथं होती. त्या गृहस्थांनी एक दिवस आम्हा मुलांना एक कोडं घातलं. ते असं कि “ एक माणूस आपल्या मुलाला घेऊन दुचाकीवर जात असतो. वाटेत त्यांना अपघात होतो. तो मुलगा जखमी होतो. त्याचा बाप त्या मुलाला रुग्णालयात आणतो. मुलावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असते. सर्जनना बोलावले जाते. सर्जन येतात, मुलाला बघतात आणि म्हणतात,की मी या मुलाची शस्त्रक्रिया मी करू शकणार नाही कारण हा माझा मुलगा आहे”. तर हे कसं शक्य आहे?? असं ते कोडं होतं…..

कोडं ऐकून सर्व मुलं बुचकळ्यात पडली. ‘सख्खा बाप-सावत्र बाप’ अशा प्रकारची उत्तरं काहींनी देऊन बघितली. माझी वेळ आल्यावर मी बरोबर उत्तर दिलं; की सर्जन व्यक्ती ही त्या मुलाची आई होती…..
माझं उत्तर ऐकून सर्वांच्या डोक्यात प्रकाश पसरला. तो पर्यंत, ‘सर्जन/डॉक्टर व्यक्ती ही स्त्री पण असू शकते’ अशी विचारांची दिशा कुणाचीच का नव्हती, याचं उत्तर त्या वयात मला मिळालं नव्हतं. ते मोठं झाल्यावर मिळालं, ते म्हणजे आमच्या समाजाची जन्मापासून होत असलेली पुरुषप्रधान मानसिकतेची जडणघडण….

अशाच अनुभवाचा पुनःप्रत्यय मला सुनिताबाईंचं “आहे मनोहर तरी” वाचताना आला होता. बाई (म्हणजे सुनिताबाई), कार चालवते हे बघून सुरुवातीला घाबरून पळू पाहणारी  मुलं नंतर बाजूच्या सीटवर बसलेल्या पु.लं. ना बघतात तेव्हा निर्धास्त होऊन मित्रांना म्हणतात, “भिऊ नका रे पोरहो; शिकिवनारा बाबा शेजारी बसलाय…”  म्हणजे, एकटी स्त्री  असेल तर ती चुकणारच; पण सांभाळून घेणारा पुरुष बरोबर असेल तर मग हरकत नाही….  वा रे वा….!!  अशी हि पुरुषप्रधान मानसिकता मुळातून बदलणं हेच मोठं आव्हान आहे!!

3 comments:

  1. सुरेख!! ही मानसिकता बदलायला सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक कुटुंबात मुलांना या समानतेचे बाळकडू पाजले जाईल!!

    ReplyDelete
  2. सुरेख!! ही मानसिकता बदलायला सुरुवात तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येक कुटुंबात मुलांना या समानतेचे बाळकडू पाजले जाईल!!

    ReplyDelete