Friday, 16 October 2015

 गुलाम अलींच्या कार्यक्रमाला शिवसेनेने विरोध केला हे बघून खूप समाधान झालं. अजूनही बाळासाहेबांच्या धगधगत्या वारशाचे निखारे विझलेले नाहीत तर….!! ह्यावर ज्यांच्या कडून जशा प्रतिक्रिया यायच्या होत्या त्या तशाच आल्या.
केजरीवाल आणि बंगालच्या मंडळींनी गुलाम अलींना आपल्याकडे बोलावले. सावरकरांचा ज्वलंत राष्ट्रवाद ज्यांना कधीच कळू शकला नाही त्या केजरीवाल सारख्यांकडून यापेक्षा निराळी काय अपेक्षा असणार?
त्या तस्लिमा नसरीन म्हणून एक उपटसुंभ बांगलादेशी लेखिका आहेत. तिकडचे अतिरेकी त्यांच्या जिवावर उठलेत म्हणून भारतात आश्रयाला असतात. त्यांना चिंता हि की भारत सौदीसारखा कट्टर धर्मवादी बनतोय कि काय? आश्रिताने आश्रितासारखंच राहावं. विनाकारण यजमानाच्या घरात नाक खुपसू नये, हे त्यांना कळत नाही. रोज रोज सहन कराव्या लागत असलेल्या भारतमातेच्या वेदना ह्या उपर्‍या बाईला काय कळणार?
या सार्‍या महाभागांना, शिवसेनेचा विरोध हा त्या महान कलाकाराला नसून ते पाकिस्तानी आहेत ह्याला आहे- ते मुस्लीम आहेत म्हणून नव्हे; हे कळणार आहे का? पाकिस्तान सर्व पातळ्यांवर,क्षेत्रांत, आघाड्यांवर भारतद्वेषाची पराकाष्ठा करतो हे दिसत नाही? सीमेवर राजरोस आमच्या सैनिकांची, सीमा वासीय निष्पाप जनतेची कत्तल करतो हे नजरेआड करायचं? रोज उठून आमचे शूर शिपाई काश्मिरात हौतात्म्य पत्करताहेत याचं काहीच नाही?
राजकारण वेगळं आणि कला,संस्कृती,खेळ वेगळे; दोन्ही गोष्टी एकमेकात मिसळू नका असा सूर लावणार्‍यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी थोडीच. एखाद्या देशाशी असलेल्या संबंधांचे कंगोरे हे कांद्याच्या पापुद्र्यासारखे अलग अलग करता येत नाहीत. साकल्यानेच बघावे लागतात. आपल्या शेजारी राहात असलेल्या इसमाने सकाळी आपल्या थोबाडीत मारली, दुपारी आपली गाडी पंक्चर केली, आणि संध्याकाळी सत्यनारायणाच्या तीर्थप्रसादाचं आमंत्रण दिलं तर ते स्वीकारून त्याच्याकडे जाणं याला कोडगेपणा,भित्रेपणा आणि स्वाभिमानशून्यता म्हणतात. भारत भले सरकारी पातळीवर तसा बाणेदारपणा  दाखवू शकत नसेल, म्हणून भारतीय जनतेने पण तसं करू नये?
हुतात्मा हेमराजसिंगचं शिरविरहित कलेवर, मेजर उन्नीकृष्ण्नच्या मातेचा हंबरडा, कॅप्टन सौरभ कालियाचं विटंबना केलेलं मृत-शरीर या आणि अशा कित्येक गोष्टींच्या थडग्यांवर गालिचे अंथरून स्वर-संगिताची मैफल ऐकावी, त्यासाठी आमच्या स्मृतींवर कातडं ओढून, आक्रंदणार्‍या भारतेमातेच्या जखमा झाकून मुर्दाड पणे ह्या कलेचा आस्वाद घ्यावा असाच अर्थ सेनेच्या भूमिकेवर टीका करणार्‍यांचा दिसतो…..

शिवसेनेनेही अशा प्रकारच्या धोरणात एकवाक्यता जोपासायला हवी. इतर बॉलिवूड पाकिस्तानी कलाकार, जावेद सारखे क्रिकटर्स यांनापण हाच न्याय लावावा. त्याने त्यांच्या हेतूची प्रामाणिकता लोकांना पटेल आणि निष्कारणची कोल्हेकुई होणार नाही…..

No comments:

Post a Comment