डोंबार्याचा खेळ पाहिलाय ना? आता इथून पुढे २-४ महिने आंतरराष्ट्रीय मंचावरचा डोंबार्याचा खेळ बघा. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हा तो डोंबार्याचा खेळ सादर करतील.
“पठाणकोट हल्ल्याच्या अतिरेक्यांवर कारवाई” नावाची लांब काठी त्यांच्या हातात असेल. “प्राप्त परिस्थिती ” नामक अतिशय बारीक आणि नाजूक दोरीवरून चालायला ते सुरुवात करतील. लष्करप्रमुख जन. राहील शरिफ आणि ISI प्रमुख हे त्या डोंबार्याचे मालक खाली जोरात ढोल वाजवीत असतील. कोंडाळं करून बसलेल्या प्रेक्षकात पाक अवाम, पाक-अतिरेकी, भारतीय जनता, नेते, जगातल्या मुस्लीम संघटना, युनो वगैरे सारे असतील. Referee च्या स्वघोषित भूमिकेत अमेरिका सर्वात पुढे असेल….
.
दोरीवरून चालता-चालता नवाझचा तोल कधी भारताकड्च्या बाजूला झुकेल. म्हणजे ‘पुरावे द्या- कारवाई करतो’ अशा वल्गना होतील. काही वरवरच्या, काडीचाही अर्थ नसलेल्या कृती केल्या जातील. असा तोल इकडे झुकला, कि भाबड्या भारतीयांच्या चेहेर्यावर हसू उमटायला लागेल. काही “देशनिष्ठ” बांधवांत चलबिचल सुरू होइल. समाजवादी/गांधीवाद्यांची कोमल अंतःकरणे भरून येऊन डोळ्यातून अश्रू वाहण्याच्या बेतात येतील. तेवढ्यात डोंबार्याचे मालक, पाक अतिरेकी मोठा गोंगाट करतील. लगेच तोल सावरून न पडता गडी पुढे पाऊल टाकेल. अमेरिका मनातल्या मनात; चीन डोळ्यांच्या फटी ताणून हसू लागतील. सामान्य भारतीयाच्या चेहेर्या वर निराशा पसरेल …..
चालताना तोल दुसर्या बाजूला झुकायला लागेल. म्हणजे भारताने दिलेले पुरावे अपूर्ण आहेत,खोटे आहेत असं म्हटलं जाइल. असा तोल झुकतोय असं झालं तर भारतीय बाजूला प्रचंड कोलाहल होईल. खुद्द नवाझच्या छातीतच धस्स होइल. कारण सीमेपलिकडे मोदी नावाचा बेभरवशाचा माणूस आहे. आतापर्यंत चांगलं होतं. चुचकारून, अमेरिकेच्या मार्फत धाक दाखवून, चीनचा बागुलबुवा दाखवल्यावर नमतं घेणारी मऊ मुलायम माणसं होती. पण मोदी-डोवाल आणि कं. चा भरवसा नाही….. परत अमेरिकाही लटकं रागावणार. काही काळ हात पिरगळणार….तेव्हा परत तोल सावरला जाईल…. आणि पुन्हा दोरीवरून चालणं सुरू….
हे असंच चालू राहिल. आपण डोळ्यात प्राण आणून नवाझ तोल जाउन आपल्या बाजूला तो कधी पडतो याची आशाळभूतपणे वाट बघत बसू. चालत चालत नवाझ शरीफ दुसरं टोक गाठून कधी सुखरूप खाली उतरला हेही आपल्याला कळणार नाही… पलिकडले लोक, अतिरेकी, ISI, शरिफ-द्वय, अमेरिका,चीन हसत एकमेकाला मिठ्या मारतील. आपण “पुढच्या हल्ल्या नंतर बघा, पाकची खैर नाही…” ह्या आश्वासनावर मनातल्या वेदनांचे कढ आतल्या आत रिचवून पुन्हा आपल्या कामाला लागू…….